मिलापनगर तलावाची झाली दुर्दशा
नैसर्गिक तलाव , डंपिंग तलाव झाला की काय ?
DT न्यूज/
डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी मधील गणेश विसर्जन तलाव म्हणून प्रसिध्द असलेला हा नैसर्गिक तलाव आता कचरा, निर्माल्य टाकण्याचा डंपिंग तलाव झाला असल्याचे दिसत असून अजून काही दिवसांनी हा तलाव म्हणून शिल्लकच राहणार नाही असे दिसते आहे. प्रथम याचे सुशोभीकरण 2002 साली तत्कालीन मा. खासदार प्रकाश परांजपे यांचा खासदार निधीतून केडीएमसीने केले होते. त्यानंतर सदर भाग आजदे ग्रामपंचायतीत आल्यानंतर त्याचे सुशोभीकरण ग्रामपंचायतीने केले होते. दोन वर्षापूर्वी पुन्हा केडीएमसीने स्वतःचा निधीतून 25 लाख खर्च करून याचे सुशोभीकरण केले होते. असे अनेकदा या तलावावर सुशोभीकरण नावाने खर्च करूनही या तलावाची दुर्दशा झाली त्यामुळे जनतेचा पैशाचा अपव्यय झाला आहे .
पूर्वी या तलावात लहान मोठ्या मूर्तींचे विसर्जन गणेश/नवरात्र उत्सवात होत असे. हा तलाव आकाराने लहान असल्याने मूर्ती विसर्जनाने मोठ्या प्रमाणात गाळ साचून आणि पिओपी, रासायनिक रंग, निर्माल्य यामुळे प्रदूषण होऊन तलावातील मासे, कासव इत्यादी अनेकदा मृतावस्थेत आढळून आले होते. सदर तलावात मोठ्या आणि पीओपी मुर्त्यांचे विसर्जन करू नये अशी विनंती येथील स्थानिक रहिवाशांनी आणि त्यांचा संघटनांनी केडीएमसीकडे वारंवार केली होती. परंतु केडीएमसीने यात लक्ष न घातल्याने डोंबिवली वेलफेअर असोसिएशन आणि मिलापनगर रेसी. वेलफेअर असोसिएशन यांनी पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादाकडे पाच वर्षापूर्वी याचिका दाखल केली होती. राष्ट्रीय हरित लवादाने त्वरित याची दखल व सुनावणी घेऊन या तलावातील मूर्ती विसर्जन करण्यास बंदी घातली होती.
गेल्या पाच वर्षापासून या तलावात मूर्ती विसर्जन होत नाही आहे. त्यामुळे सदर तलाव प्रदूषणमुक्त व स्वच्छ राहील असे वाटले होते. परंतु यानंतरही केडीएमसीने या तलावावर पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शिवाय काही बेजबाबदार नागरिक या तलावात निर्माल्य/कचरा फेकून या तलावाची दुर्दशा करीत असून याला तितकेच तेही जबाबदार आहेत. सदर तलावावर देखेख, स्वच्छतेसाठी एक कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केडीएमसी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार करीत आहेत. पूर्वी ग्रामपंचायतीचा काळात या तलावसाठी एक कर्मचारी ठेवण्यात आला होता. तो कर्मचारी बेजबाबदार नागरिकांना निर्माल्य/कचरा टाकण्यापासून परावृत्त करायचा व तलावाचा परिसराची नियमित साफसफाई करीत होता.
जून 2015 पासून हा तलाव/विभाग केडीएमसीकडे गेल्यापासून या तलावाच्या साफसफाईकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. तलावाचा आजूबाजूला झाडी झुडपे वाढलेली असून आता या तलावाचे पाणी हिरवे खराब झाले असून बाजूचा गटाराचे सांडपाणी त्यात जात असल्याने दुर्गंधी येत आहे. यामुळेच येथे मच्छरांचे प्रमाण वाढले असून यातून रोगराई पसरण्याची शक्यता आहे. या तलावाचा बाहेर अनेकजण जुन्या देवांचा मूर्ती/फोटो आणून ठेवत असतात तर कधी कधी काहीजण केसासकट पिंडदान करून तलावात टाकत असतात. पूर्वी याच तलाव परिसरात अनेक पक्षांचे वास्तव्य पाहण्यास मिळायचे पण आता तेही पाहण्यास मिळत नाही. *सदर तलावाची नियमित साफसफाई करणे आणि एक कर्मचाऱ्याची या तलावावर नियुक्ती करणे, एवढीच आमची कळकळीची मागणी असून हा तलाव, पर्यावरण वाचविण्यासाठी ही मागणी स्थानिक राजु नलावडे व वर्षा महाडिक यांनी केली आहे, ज्याने एक सुंदर तलाव वाचू सकेल.*





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा